घणसोलीतील सिडको गृहसंकुलाच्या समस्या सोडवा

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडको महामंडळाने घणसोली से- 10 मध्ये उभारलेल्या गृहयोजनेतील रहिवासी विविध समस्यांनी त्रस्त असून या समस्या सोडविण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. गणेश नाईक सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे 21 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी पत्र देवून केली आहे. यासंदर्भात माजी आ. संदीप नाईक यांनी सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी यांची प्रत्यक्ष भेट घेवून या गृहसंकुलाच्या समस्या त्यांच्यासमोर मांडत त्यांची सोडवणूक करण्याची मागणी लावून धरली. 

सिडकोने 14,838 घरांसाठी 2018मध्ये कळंबोली, तळोजा, घणसोली या भागातील लॉटरी काढली. घणसोली से- 10 येथे 1272 घरांची निर्मिती केली आहे. लाभार्थ्यांपैकी बहुसंख्य लाभार्थी या गृहसंकुलात रहावयास आले असून त्यांना घरांचा ताबा देवून सहा महिने होत आले आहेत. परंतु सुरूवातीपासूनच या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक आ.गणेश नाईक यांना समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले आहे. रहिवाशांच्या या तक्रारींची तात्काळ दखल घेत आ. नाईक यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय-संचालकांना पत्र लिहून समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या गृहसंकुलात तीव्र पाणीटंचाई आहे. बाहेरून टँकर मागवून रहिवासी तहान भागवत आहेत. या गृहसंकुलाला तातडीने मुबलक पाणी पुरवठा करणारी नवीन जलवाहिनी द्यावी, अशी मागणीही आ. नाईक यांनी केली आहे. 

गृहसंकुलामध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो आहे तो बंद करावा. गांभीर्याची बाब म्हणजे नव्याने बांधलेल्या या गृहसंकुलामध्ये छतांना आणि इमारतींना पाण्याची गळती आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करून आवश्यक त्या संरचनात्मक दुरूस्त्या व डागडूजी करून घ्यावी. या गृहसंकुलामध्ये सोसायटी स्थापन न झाल्याने सध्या सिडको महामंडळच गृहसंकुलाची देखभाल करते आहे. परंतु यामध्ये अनेक उणिवा असून त्याचा त्रास रहिवाशांना होतो आहे. या विरोधात रहिवाशांमध्ये कमालीचा असंतोष खदखदतो आहे. गृहसंकुलामधील सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अग्निशमन यंत्रणा परिपूर्ण नाही. सीसीटिव्ही यंत्रणा नसल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गृहसंकुलाच्या कुंपन भिंतीची उंची वाढविण्याची तसेच. संकुलातील रस्त्यांवर रंबलर बसविण्याची आवश्यकता आहे. विद्युत दिवे बसवायला हवेत. इमारतींची लिफ्ट वारंवार बंद पडते आहे. अपुर्‍या सफाई कर्मचार्‍यांमुळे गृहसंकुलामध्ये अस्वच्छता असते. या सर्व असुविधा दूर करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली असून याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.