नवी मुंबई (प्रतिनिधी) - खारघर येथील प्रसिध्द इस्कॉन मंदिरातील तीन दानपेट्या फोडून आतील रोकड चोरी करणार्या दोन बांग्लादेशी घुसखोर सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाच्या पोलिसांनी जेरबंद करत या दुकलीचा पर्दाफाश केला आहे.
राजू फरहात शेख (26), रा.मुळगाव- पेरवली, जिल्हा कालिया, राज्य नराईल बांग्लादेश व अमिरूल उर्फ आकाश मन्नन खान (23), रा. मुळगाव बावपूर, जिल्हा कालियॉ, राज्य नराईल बांग्लादेश अशी या प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे असून दोघांकडून 80 हजारांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील प्रसिध्द इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून आतील रोख रक्कम चोरुन नेण्याचा गंभीर गुन्हा दि.21 जानेवारी 2022 रोजी घडला होता. सदरची बाब ही अतिशय गंभीर, संवेदनशिल व नागरिकांच्या भावनांशी निगडीत असल्याने नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुुमार सिंह व सह पोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) महेश घुर्ये, यांनी सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत पोलिसांना विशेष सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवती कक्ष, गुन्हे शाखेचे वपोनि विजयसिंह भोसले व सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा समांतर सुरु असताना, मध्यवती कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे यांना इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करणार्या सराईत आरोपीबाबतची खात्रीशिर माहिती मिळाली होती. या माहितीवरून दि.14 फेबु्रवारी 2022 रोजी मध्यवती कक्षाच्या पोलिसांनी ओवेगाव, कॅम्प परिसर, खारघर येथे सापळा लावून उपरोक्त दोघा आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. सदर दोघे गुन्हेगार अतिशय सराईत गुन्हेगार असल्याने दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी खारघर सेंट्रल पार्क येथील प्रसिध्द इस्कॉन मंदिरातील तीन दानपेट्यांमधील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याने या दोघांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होवून दोघांनाही अटक करण्यात आली असून 9 दिवस पोलिस कोठडी मंजूर झाली आहे.
मध्यवती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व पोलीस अंमलदार नितीन जगताप, मंगेश वाट, किरण राउत, प्रकाश साळुंखे, विजय खरटमोल, राहुल वाघ व लक्ष्मण कोपरकर आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे. दरम्यान,उपरोक्त आरोपी हे मंदिर चोरी व इतर घरफोडी चोरीच्या गुन्हयात सराईत असल्याने अशा स्वरुपाच्या इतर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयात ते पाहिजे आरोपी असल्यास नवी मुंबई गुन्हेशाखा मध्यवर्ती कक्षाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्याशी मो.नं.9427963658 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.