पनवेल (प्रतिनिधी) - समाजात केवळ महिला सक्षमीकरणावर चर्चा करून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्यक ते संबंधित उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सीता दळवी यांनी केले आहे.
कुटुंबासाठी पूर्ण वेळ देणार्या महिलांनी स्वत:साठीही थोडा वेळ काढावा, जेणेकरून त्याही स्वावलंबी होऊ शकतील, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत सीबीडी वार्ड क्र. 38 मधील सामाजिक कार्यकर्त्या सीता रामचंद्र दळवी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस एनजीओ सेलअंतर्गत राज्य शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचतगट मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या शिबिरात महिलांना महिला बचत गटांशी निगडित विविध व्यवसायांबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतानाच सीबीडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सीता रामचंद्र दळवी यांनी महिलांना मदतीचे आश्वासन दिले. त्याचबरोबर त्यांनी अधिकाधिक महिलांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीजीसी अधिकारी वर्षा पाटील म्हणाल्या की, आजमितीस महिला घरबसल्या स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. मग ते शिवणकाम असो, ब्युटी पार्लर असो किंवा टिफिन सेवेसारखे इतर काम असो त्या करू शकतात असे स्पष्ट करून आजच्या काळात महिलांनी सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या शिबिरात महिलांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी बँकेकडून कशा प्रकारे मदत मिळू शकते आणि बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा त्या व्यवसाय वाढवण्यासाठी कसा वापर करू शकतात याबाबतचे मार्गदर्शनही मान्यवरांकडून करण्यात आले.
या शिबिराप्रसंगी उपस्थित असलेले नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबईच्या सरचिटणीस अस्मिता पाटील, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा रेखा गोदाम आदींनी समाजसेविका सीता दळवी यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतूक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव रामचंद्र दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनात, महिलांना त्यांच्या व्यवसायात लागणारे साहित्य जसे की शिलाई मशीन किट, ब्युटी पार्लर किट जीसी यासह इतर गोष्टी पुरविण्याचे आश्वासन दिले. तसेच महिलांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्वरुपाच्या शिबीरांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार असून यासाठी आपल्या अर्धांगिनी सीता दळवी यांच्या पाठिशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.