नवी मुंबई (प्रतिनिधी)- शहरात मोबाईल चोरीचे गुन्हे वाढलेले असतांनाच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल पथकाने एका सराईत मोबाईल चोरट्यास जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून साडेचार लाखांचे एकूण 28 मोबाईल फोनही हस्तगत केले आहेत. सलमान इक्बाल मुकादम, (23 वर्ष) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी नवी मुंबईसह पुणे आयुक्तालयातील एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोबाईल चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी याबाबत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश पोलिसांन दिले आहेत. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, कक्ष 2, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून तांत्रिक महितीवरून आरोपी सलमान इक्बाल मुकादम यास सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून साडेचार लाखांचे एकूण 28 चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. गुन्हेशाखा कक्ष-2 चे एपीआय संदिप गायकवाड यांच्यासह पीएसआय वैभव रोंगे, पोलिस हवालदार अनिल पाटील, ज्ञानेश्वर वाघ, प्रशांत काटकर, मधुकर गडगे आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.